पणजी - तज्ञ आणि भयमुक्त वकिलाला महत्त्वाच्या खटल्यातून हकलण्याचा प्रयत्न आहे. सीबीआयने संजीव पुनाळेकर यांना केलेली अटक बेकायदा असून त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेकडून करत बांबोळी-पणजी येथील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने केली.
निदर्शनाविषयी बोलताना हिंदू विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अॅड. सुरेश कुलकर्णी म्हणाले, अॅड. पुनाळेकर यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळले आहेत. त्यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदा असून आम्ही त्याचा निषेध करतो. पक्षकार आणि वकील यांना कायद्याने दिलेल्या स्वातंत्र्याचा अवमान आहे. तसेच पक्षकाराने लिहून दिलेल्या म्हणण्याच्या आधारे अटक होऊ शकत नाही. त्यामुळे सीबीआयने बेकायदेशीरपणे अटक केलेल्या पुनाळेकर यांची सूटका करावी आणि यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना अटक करावी. त्यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.
या निवेदनाच्या प्रती केंद्र सरकार, गृह मंत्रालय यांनाही देण्यात आल्या आहेत. जर पुनाळेकर यांची सूटका झाली नाही, तर अन्य राज्यातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालय यांच्यासमोर निदर्शने केली जातील. दरम्यान, निदर्शकांनी बांबोळी-पणजी येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर कार्यालयाबाहेर निदर्शने केली.