पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधताना 20 लाख कोटींचा निधी जाहीर केला. याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वागत केले आहे. यामुळे भारताला जगात आर्थिक शक्ती बनण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे श्रीपाद नाईक म्हटले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवून तोही संपण्याच्या जवळ आला आहे. अशावेळी पंतप्रधानांनी देशाला संबोधून विविध घोषणा आणि पॅकेजेस जाहीर केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जे समाजातील सर्व घटकांना व्यापून देशाला सध्याचे आव्हान पेलण्यास मदत करेल. पंतप्रधानांनी सर्वांना कठोर परिश्रम घेण्यासाठी व भारताला जागतिक आर्थिक शक्ती बनण्यासाठी प्रेरित केले आहे.
दरम्यान, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही याचे स्वागत केले आहे. तानावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या इतिहासात हे मोठे आर्थिक पॅकेज आहे. जे जीडीपीच्या 10 टक्के इतके आहे. देशाला स्वयंपूर्ण आणि विकसित बनविण्यासाठी यामधून पंतप्रधान मोदी यांची आर्थिक दूरदृष्टी दिसून येते.