पणजी (गोवा) - आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजप त्यांच्या अकार्यक्षम पद्धतीमुळे हटविणार, असा गौफ्यस्फोट केला होता. मात्र, राज्यात मुख्यमंत्री बदलाविषयी कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठीxची भेट घेतली होती, या भेटीत राज्यातील निवडणुकीविषयी चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड उपस्थित होते. या दिल्ली भेटीवर आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना हटविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र, राज्यात तूर्तास तरी असा कोणताही निर्णय नसून ही अफवा असल्याचे भाजपा कडून सांगण्यात आले आहे.
प्रमोद सावंत अकार्यक्षम मुख्यमंत्री - मनिष सिसोदिया
गोव्यात भाजपा सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना आपला पराभव निश्चित दिसत आहे. म्हणूनच निवडणुकीच्या दोन महिने अगोदर मुख्यमंत्री बदलांची नामुष्की भाजपवर आली आहे, असा गौप्यस्फोट आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच भाजप उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरात प्रमाणे गोव्यातही मुख्यमंत्री बदल करण्यात येईल असेही ते म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंतच मुख्यमंत्री - भाजप
राज्यातील मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हे आमचे नेते घेतात. आपने याबाबतीत भाष्य करायची गरज नाही आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. तसेच डॉ. प्रमोद सावंत हेच राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्त्वाखालीच आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री गुजरातला रवाना
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीत तर शनिवारी अचानक गुजरातला पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आगामी काळात नेतृत्व बदलाचा काय निर्णय होतो की याभेटी निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी घेतल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.