पणजी - मुलांविषयी असलेली ओढ मला 'सरोगेट फादर' बनण्यासाठी प्रेरक ठरली. यामुळे मुल दत्तक घेण्याचा विचार होता. मात्र, कायद्याच्या गुंतागुंतीमुळे सरोगसीचा निर्णय घ्यावा लागला, असे मत युसुफ खान यांनी व्यक्त केले. पुण्याचे रहिवासी असलेल्या खान यांनी गोव्यातील डॉ. केदार फडते यांच्यामुळे आपले पिता बनण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
हेही वाचा - CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी
पणजीतील तारांकित हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खान म्हणाले, अशाप्रकारे एकल पालक बनण्याचा निर्णय खूप पूर्वी घेतला होता. त्यासाठी मुल दत्तक घेण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, एकल असल्यामुळे आणि दत्तक कायद्यातील गुंतागुंतीच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे 'सरोगेट फादर' बनण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. यासाठी उपलब्ध असलेल्या एजन्सीच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यानंतर 12 व्या प्रयत्नाला पणजी-गोव्यातील डॉ. केदार फडते यांच्यामुळे यश आले. ही सर्व इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च च्या मार्गदर्शक तत्वानुसार पार पाडण्यात आली आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचं ठरलं... म्हणाले लवकरच पक्षांतर!
आज मी 36 वर्षांचा असून प्रत्यक्ष वडील बनण्याच्या प्रक्रियेला चार वर्षांपूर्वी सुरुवात केली, असे सांगून खान म्हणाले, घरच्यांना विशेषतः आईला वर्ष भरापूर्वी सांगितले. त्यानंतर घरातील मंडळींनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझा निर्णय पक्का होता. युसुफ खान यांनी आपल्या 18 दिवसांच्या बालकाचे 'कबीर' असे नामकरण केले आहे. ते स्वतः पुण्यामध्ये संगीत शिक्षक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.