पणजी - गोव्यातील तबलिग-ए-जमातच्या आठ लोकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांनी दिल्लीमध्ये झालेल्या निझामुद्दीन मरकज कार्यक्रमाला हजेरी लावली होती, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
या आठ जणांसोबत आणखी एका तबलिगी सदस्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तसेच, गोव्यामध्ये सध्या तबलिगी जमातचे ४६ लोक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. यांपैकी बहुतांश लोक हे मूळचे गोव्याचे रहिवासी नाहीत. त्यांना गोव्यातील विविध घरांमधून आणि मशीदींमधून शोधून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असेही राणे यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार तबलिगी जमातच्या बहुतांश लोकांनी फेब्रुवारीमध्ये निझामुद्दीन भागाला भेट दिली होती. तसेच, १५ मार्चनंतर दिल्लीहून तबलिगी सदस्यांपैकी कोणीही गोव्यात परतले नाही.
हेही वाचा : दारूसाठी काय पण! 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू