पणजी : गोव्यात आतापर्यंत 1688 लोकांच्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तपासण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामधील 1653 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 35 अहवालांची प्रतीक्षा आहे. तर 3 एप्रिलपर्यंत केवळ 7 जण पॉझिटिव्ह सापडले होते. ज्यांच्यावर कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले.
सोमवारी दिवसभरात केवळ 3 जणांना फेसिलिटी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 जणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर दिवसभरात 147 जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. गोव्यात 29 जानेवारीपासून आतापर्यंत 1794 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
गोव्यात स्वँब, अँटीबॉडी चाचणी
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे की, कोविड-19 विरोधात लढण्यासाठी गोवा पूर्णपणे सुरक्षित आहे. आता गोव्यातील प्रयोगशाळेत अत्याधुनिक पीसीआर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यामुळे स्वँब आणि अँटिबॉडिज अशी दोन्ही प्रकारची चाचणी येथे करता येणाय आहे. आम्ही अशी यंत्रणा उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, ज्यामुळे एका दिवसात 450 ते 1000 स्वँब चाचण्या करणे शक्य होईल. तसेच अँटिबॉडिजची आवश्यकता भासेल तेव्हा तपारणी करणे शक्य होईल.