नाशिक - आपल्या घराकडे जाणार्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना बुधवारी म्हसरूळ शिवारातील कलानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
कलानगर पोकार सर्कल या ठिकाणी राहणाऱ्या शिल्पा रघुनाथ धात्रक या बुधवारी दुपारी दिंडोरी रोड समोरून आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होत्या. यावेळी मागून पल्सरवर आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यात असलेली दीड तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून नेली. यावेळी धात्रक यांनी प्रसंगावधान राखत सोनसाखळी धरून ठेवल्याने साखळी तुटली आणि अर्धी साखळी धात्रक यांच्याकडे राहिली तर चोरट्यांनी अर्धी सोनसाखळी घेऊन पोबारा केला आहे.
परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर हे करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरी वाहनचोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे घडत असलेल्या या प्रकारांमुळे नाशिककर भयभीत झाले असून, आता पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन चोरट्यांना गजाआड करावे अशी मागणी करण्यात येत आहे.