नाशिक - सामाजिक जाणिवेतून कोरोना काळात सरकारच्या मदतीसाठी देशभरातील अनेक मंदिरे आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याची उदाहरणे समोर आहेत. जिल्हाप्रशासनाने अधिग्रहित केलेल्या जागेच्या भाड्यापोटी त्र्यंबकेश्वर देवस्थानाने जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 99 लाख 63 हजार रुपये इतक्या रकमेची मागणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र
त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील देवस्थानला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पत्र लिहीले आहे. आपल्या संस्थानाची नोंद सार्वजनिक न्यास स्वरूपाच्या सेवाभावी संस्थानात असल्याचे त्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे अशा संस्थानाने शासनाच्या मोफत उपचाराच्या प्रयत्नास सहकार्य करणे आवश्यक होते. तथापी असे न करता कोणताही खुलासा न करता पैशांची मागणी केली आहे. असे खरमरीत पत्र जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर देवस्थानला दिले आहे. एकीकडे राज्यातील अनेक दानशूर संस्था मंदिरे कोरोना काळात सरकारच्या मदतीसाठी पुढे आली आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तिजोरीत कोट्यावधी रुपये पडलेले आहे. त्या देवस्थानाने प्रशासनाकडे पैशांची मागणी करणं अयोग्य आहे. अशी मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी देवस्थानच्या माजी विश्वस्तांनी केली आहे. तसेच प्रशासनानेही संस्थानाकडे विस्तृत कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्र दिले आहे.
हेही वाचा - अजित पवार आमचेही ऐकत जा, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत - संजय राऊत