नाशिक - 8 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगात पाळीव प्राण्यांमध्ये मांजरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मांजरीला संवेदना असते असे म्हटले जाते. म्हणून घराघरात पाळीव प्राण्यांमध्ये आपल्याला मांजर दिसून येते. अशाच प्रकारे शहरातील महात्मा नगर भागात राहणाऱ्या सैय्यद कुटुंबात सदस्यांपेक्षा अधिक मांजरी असून, हे कुटुंब त्यांच्या घरातील व्यक्तींप्रमाणे या मांजरींचा सांभाळ करतात. या आंतरराष्ट्रीय मांजर दिवसानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...
घरात एखादा पाळीव प्राणी असावा, असे सर्वांनाच वाटते. त्यातही अनेकांना मांजर पाळायला आवडते. 8 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आज जगात पाळीव प्राण्यांमध्ये मांजरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे म्हटले जाते. नाशिकच्या महात्मानगर भागात राहणाऱ्या उच्च शिक्षित कुटुंब असलेल्या सैय्यद कुटुंबात एक दोन नाही तर तब्बल 13 पर्शियन जातीच्या मांजरी आहेत. हे कुटुंब या मांजरींचा सांभाळ घरातील सदस्यांप्रमाणे करतात. गेल्या चार पिढीपासून त्यांच्या घरात मांजरींचा सांभाळ करण्याची परंपरा आहे. भारतात रस्त्याने मांजर आडवी गेली की कामे होत नाही अशी अंधश्रद्धा असून, ती या कुटुंबाला भेट दिल्यावर दूर होते. या कुटुंबाला मांजरींचा इतका लळा लागला आहे की त्यांचा दिवस देखील मांजरींच्या सेवेपासून सुरू होतो, अशी माहिती सैय्यद कुटुंबियांनी दिली.
चार पिढीपासून केला जातो मांजरीचा सांभाळ..
चार पिढ्यांपासून आमच्याकडे मांजरी आहेत. यात पर्शियन आणि भारतीय मांजरीदेखील आहे. आम्ही त्यांचा कुटुंबातील लहान सदस्यांप्रमाणे सांभाळ करतो. अनेकदा आम्ही एखादे मांजर आजारी पडली तरी त्याची काळजी करतो. त्यासाठी आम्ही रात्रसुद्धा जागून काढल्या आहेत. या मांजरींसोबत आयुष्य आनंदी जात आहे. आमच्या आनंदी आयुष्याचा त्या एक भाग झाल्या आहेत.
मांजरीत असतात संवेदना..
आम्ही घरात चार सदस्य असून, प्रत्येक मांजरीने त्यांच्यासाठी एक एक सदस्य निवडले आहे. ते त्यांच्या हातूनच जेवण करतात. त्यांच्याजवळ बसतात. मांजरीमध्ये खूप संवेदना असते. एखादी व्यक्ती आनंदी आहे की दुःखी त्यांना लगेच कळते. अशा वेळी त्या व्यक्तीजवळ येऊन आधार देण्याचा प्रयत्न करतात. या मांजरीसोबत प्रत्येकांचे एक खास नातेच तयार झाले आहे.
अनाथ मांजरीचा देखील सांभाळ करतात..
ओळखीच्या सर्वच व्यक्तींना माहिती आहे की आम्ही मांजरीचा सांभाळ करतो. अशा वेळी ज्या ओळखीच्या व्यक्तींकडून मांजरीचा सांभाळ होत नाही किंवा अपघातात एखादी मांजर जखमी झाले असेल ते आमच्या येतात. मग आम्ही त्या मांजरी दत्तक घेतो त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो. अशाही अनेक मांजरी सध्या आमच्याकडे आहेत.
मांजरींच्या आरोग्याची घेतली जाते काळजी..
घरातल्या कुटुंबातील प्रत्येकाला आता मांजरींच्या सहवासाची सवय झाली आहे. या मांजरीदेखील आमच्यासोबत सकाळी उठतात आणि रात्री झोपतात. आम्ही त्यांना दररोज तीन वेळा कॅटफूड देतो. मोठ्या मांजरीचे खाणे आणि पिल्लांचे खाणे वेगळे असतं. त्यांच्या खाण्यातुन त्यांना प्रथिने, व्हिटामिन दिले जाते. तसेच त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी केली जाते, अशी माहीती सैय्यद कुटुंबीयांनी दिली.