नाशिक - आपण आजपर्यंत लग्नाची वरात ही घोड्यावरुन चारचाकी अथवा मोटर सायकल वरून किंवा जास्तीत जास्त विमान किंवा हेलिकॉप्टर मधून निघाल्याचे बघितले असेल. मात्र कधी नवरदेव नवरीने बैलगाडीने आपल्या लग्नाची वरात काढल्याचे बघितलं नसेल. मात्र नाशिकच्या सिडको भागातील मोरवाडी परिसरात राहणाऱ्या अमोल नामदेव सोनवणे यांनी आपल्या नवविवाहित वधू हर्षदा नामदेव गामणे-सोनवणे हिला चक्क बैलगाडीतून वरात काढत आपल्या घरी आणले आहे.
आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगून शेतकरी वर्गाबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या नवविवाहीत सोनवणे दाम्पत्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीने विवाहस्थळाहून घर गाठल्याने या उपक्रमाची चर्चा नवीन नाशिक परिसरात चांगलीच रंगली होती. या दोघांनी लग्नानंतर बैलगाडीतून औरंगाबाद नाका ते मोरवाडी असा ११ किमीचा प्रवास करत आपल्या सहजीवनाची अनोख्या पद्धतीनं सुरुवात केली आहे.
नवीन नाशिक हा मुळातच शेतकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. नविन नाशिकच्या लगत असलेल्या अंबड, मोरवाडी, पाथर्डी, उंटवाडी आणि कामठवाडे या पंचक्रोशी आहेत.यामुळे याठिकाणी अनेक कष्टकरी आणि शेतकरी रहिवास करतात.यातील अनेक लोक आजही शेती करतात. यात मोरवाडी परिसरात राहणारे अमोल सोनवणे हे देखील शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांनी पहिल्यापासूनच आपल्या वधूला बैलगाडीतून वरात काढत घरी आणण्याचा मानस ठेवला होता. त्याच प्रमाणे मंगळवारी अमोल नामदेव सोनवणे यांचा हर्षदा नामदेव गामने याच्याशी विवाह औरंगाबाद नाका परिसरातील एका लॉन्स मध्ये संपन्न झाला आणि या दाम्पत्यांनी लग्न ठिकाणापासून ११ किमी प्रवास करत मोरवाडी येथे निवासस्थानी येण्यासाठी बैलगाडीचा वापर केला.
आपल्या होणाऱ्या पतीने आपल्याला बैलगाडीतून घरी घेऊन जाण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर आपणही शेतकऱ्याची कन्या आहोत, म्हणूनच त्यांच्या या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत बैलगाडीतून घरी येण्याला पसंती दिल्याचे नववधू हर्षदा यांनी सांगितले.
कोरोनामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मोजक्याच उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. त्यातच माझा भाऊ हा शेतकरी कुटुंबातला आहे. मग आपल्या नव्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात कृषी पंरपरेशी निगडीत पद्धतीनेच करायचे त्यांनी ठरवले. तसेच शेतकरी वर्गात बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळख आहे आणि याचाच अभिमान बाळगत हर्षदा आणि अमोल या नवविवाहित दाम्पत्याने ११ किमीचा प्रवास बैलगाडीतून केला असल्याचे वराचे मावस बंधू गोकुळ नागरे यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्ससिंग तसेच सुरक्षा साहित्य वापरून मोजक्या लोकांमध्ये झालेल्या विवाहानंतर हे दाम्पत्य चक्क बैलगाडीतून घरी आले यामुळे शेतकरी वर्गाचा महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या बैलगाडीचा वापर करून हे दाम्पत्य घरी आल्याने हा विवाह नविन नाशिक परिसरात चर्चेचा विषय बनलाय.सर्व नविन नाशिक वासीयांचे लक्ष या सोनवणे आणि गामने परिवाराने या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून आपल्याकडे केंद्रित केले आहे.