नाशिक - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हा साथीचा संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केला आहे. दररोज झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या बघता नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क न वापरल्यास कलम 188नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मास्क हे मानांकित किंवा घरगुती योग्य पद्धतीने तयार केलेले स्वच्छ असावेत. शहरात अनेक ठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी पोषक स्थिती आहे. नाशिक शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असल्याने नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य आहे.
कोरोना विषाणुच्या या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. कलम 144नुसार लोकांच्या संचारास मनाईदेखील करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी मास्कचा वापर करणे सक्तीचे राहनार आहे.