नाशिक - व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे आमिष दाखवत भारतभर फसवणूक करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने एअरटेल व वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे बनावट अकाउंट उघडून ग्राहकांची 1 कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नमस्कार, मी एअरटेल मोबाईल कंपनीतून बोलत आहे. तुम्हाला व्हीआयपी नंबर पाहिजे आहे का? असल्यास कंपनीच्या अकाउंटवर पैसे जमा करा व काही तासांत तुम्हा तुमच्या पसंतीचा नंबर मिळाले. अशा फसव्या संभाषणातून अनेक मोबाईल ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केले आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील एका व्यक्तीला व्हीआयपी मोबाईल नंबर देतो, असे सांगून साडेचार लाख रुपये बँकेतील खात्यावर भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पैसे भरताच संशयित आरोपीने मोबाईल नंबर बंद करून हे पैसे परस्पर काढून घेतले होते. या घटनेनंतर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यां सखोल तपास करून मुंबई आणि नाशिकमधून पाच जणांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
हे आरोपी व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे आमिष दाखवून त्या बदल्यात वेगवेगळी किंमत एका मोबाईल कंपनीचे नावसांगून बनावट बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगत आणि रक्कम जमा होताच फोन बंद करून जमा झालेली रक्कम बँकेतून काढून आपापसात वाटून घेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या संशयितांनी लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून विविध बँकांचे बनावट शिक्के, बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आधार कार्ड, बनावट भाडेकरार तसेच लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणारे तेरा मोबाईल एक लॅपटॉप आणि महत्वाचे म्हणजे 17 बनावट अकाउंट आढळून आले. या आरोपींनी हैदराबाद, मुंबई, रायपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, परळी, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील लोकांची सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.