नाशिक: कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन या नव्या व्हेरियंटचा धोका वाढत आहे. सुदैवाने जिल्ह्यात एकही रुग्ण ओमायक्राॅन पाॅझिटिव्ह नसला तरी हा धोका संपलेला नाही. त्यात जिल्ह्यात लसीकरण मोहिम संथ गतीने सुरु आहे. विशेष म्हणजे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
२३ पासून 'नो व्हॅक्सिन नो एंट्री'
जिल्ह्यात १८ वया पेक्षा जास्त असलेले ५१ लाख ७५ हजार ८८९ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ४१ लाखांच्या आसपास नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ८० टक्के इतके आहे.पण अजून दहा लाख नागरिक असे आहेत की त्यांनी अजून पहिलाच डोस घेतलेला नाही. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या २० लाखांचा घरात असून हे प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास आहे. नागरिक लस घेण्यास टाळत असल्याचे पाहून पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गुरुवारपासून 'नो व्हॅक्सिन नो एंट्री' हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.