नाशिक - जिल्ह्यात आठ दिवसानंतर पारा पुन्हा घसरला असून, आज नाशिक शहराचे तापमान 9.1 अंश सेल्सिअस तर निफाडचा पारा 8.2 अंशापर्यँत खाली घसरला आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत.
नाशिककर घेतायेत गुलाबी थंडीचा आनंद
नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. तसेच सकाळी गोदावरी नदीवर धुक्याची पांढरी चादर पसरली असल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये आठ दिवसांपूर्वी सलग दोन दिवस दाट धुक्याचा आनंद नाशिककरांनीं घेतला होता. त्यानंतर मात्र पारा 13 ते 15 अंश सेल्सिअसपर्यँत कायम राहिला. सध्या नाशिककर सकाळी आणि रात्री गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहे. तर दिवसभर वातावरणात गारवा असल्याने नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना दिसत आहेत.
शेतकरी मात्र चिंतेत
तापमानाचा पारा अधिक खाली आल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. जास्त थंडीमुळे द्राक्ष मन्यांना तडे जाऊन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करत असल्याचे दिसून येत आहे.
साथीच्या आजारात वाढ
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कडाक्याच्या थंडीमुळे लहान मुले तसेच वयोवृद्धांमध्ये सर्दी, खोकला, तापाची लक्षणे जाणवत असून, कडाक्याच्या थंडीत सकाळच्या सुमारास बाहेर पडू नये, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच घराबाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
हेही वाचा -अतिवृष्टी नुकसान पाहणी; केंद्रीय पथक उस्मानाबाद - औरंगाबाद दौऱ्यावर