नाशिक - भाजप कार्यालयावर हल्ला करणारे संशयित शिवसैनिक हे संजय राऊत यांच्या छत्रछायेखाली मुंबईत असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप कार्यालयावर हल्ला करणारे शिवसैनिक संजय राऊत यांचा आश्रयाखाली - आमदार फरांदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावरती रान पेटवले होते. त्याची सुरुवात नाशिकपासून झाली होती. नाशिकच्या भाजप कार्यालयावरती संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हल्ला करून मोडतोड केली होती. या घटनेनंतर संपूर्ण नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पदाधिकाऱ्यांना अटक करावी यासाठी भाजपने नाशिक पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले होते. भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. परंतु, आज शुक्रवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना, त्यावेळी त्यांच्या पाठीमागे भाजप कार्यालयावर हल्ला करणारे संशयित आरोपी दिपक दातीर आणि बाळा दराडे हे होते. या घटनेनंतर आता मात्र भाजप आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन, या हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घ्यावे व नाशिक पोलिसांना स्वाधीन करावे व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या तीन दिवसापासून पोलीस आयुक्त कार्यालयात भाजपचे पदाधिकारी हे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. पोलिसांना ते सापडत नाहीये, परंतु आरोपी हे मुंबईत खुलेआम फिरत आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या कार्यकर्त्यांना अटक लवकर झाली नाही तर अजून काही वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुन्हे फक्त भाजप कार्यकर्त्यांवर नाही तर शिवसैनिकांवर देखील दाखल - संजय राऊत
शिवसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कठोर कलम लावलेले आहेत. गुन्हे फक्त भाजप कार्यकर्त्यांवर नाही तर शिवसैनिकांवर देखील दाखल झाले आहेत. पोलीस फक्त भाजप कार्यकर्त्यांचा शोध घेत नाही तर शिवसेना कार्यकर्त्यांचा देखील शोध घेत आहेत. या सर्व कलमांचा अभ्यास करून यातून कसा मार्ग काढून कायदेशीर लढाई लढावी लागणार असल्याचे खासदार संजय राऊत यानी सांगितले आहे.
आम्ही अटकेला घाबरत नाहीत. आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक भाजप कार्यालयावय हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी आपण आहात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, आता ते माझ्या पाठीशी आहेत. ते पाठीशी राहील्यामुळे शिवसेना पुढे जात असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - ईडीकडून एकनाथ खडसेंची नेमकी कोणती मालमत्ता जप्त? महसूल विभागही अनभिज्ञ? चर्चांना उधाण