नाशिक- तलाठी पदाच्या भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे नाशिक शहरात 6 केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, व्ही एन नाईक पॉलिटेक्निकल कॉलेज या सेंटरवर तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले. तसेच शहरातील दुसऱ्या केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे तलाठी भरतीत पुन्हा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. महापरीक्षा पोर्टलमुळे मनस्ताप आणि मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
महापरीक्षेंतर्गत शहरात २ जुलैपासून तलाठी पदासाठीची परीक्षा सुरू आहे. मात्र, या परीक्षेसंदर्भातील अनेक अडचणी अजूनही समोर येत आहेत. मंगळवारी शहरातील व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निकल इन्सिट्युट या परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही.
शहरातील विविध सहा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जात आहे. सकाळी १० वाजता सकाळचे सत्र तर दुपारी २ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागदपत्रे तपासली जात असतानाच सर्व्हर डाउन असल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार प्रयत्न केला तसेच शासनाच्या परीक्षा नियंत्रकांनादेखील याबाबतची माहिती दिली. परंतु परीक्षेच्या निर्धारित वेळेत म्हणजे दहा वाजेपर्यंत सर्व्हर सुरू होऊ न शकल्याने अखेर परीक्षा रद्द करावी लागली.
अनेक केंद्रांवर मुलांना अडचणी येत असताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.
तलाठी परीक्षेच्यावेळी तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांची 25 व 26 जुलैला ही परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती महापरिक्षा पोर्टल द्वारे कळविण्यात येईल तसेच फेरपरीक्षेचे हॉल तिकीटही पोर्टलवर अपलोड केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. किमान या फेरपरीक्षेत गोंधळ होऊ नये, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.