नाशिक - नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा असून त्यासाठी सर्वानी कामाला लागा. बाळासाहेबांनी जे नाशिकबाबत स्वप्न पाहिले ते पूर्ण करा, असा आदेश सेना नेते तथा नाशिक संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे नाशिक दौर्यावर आहेत. गुरुवारी देवळाली गावातील शिवसेनेच्या जुन्या शाखेचे त्यांच्या हस्ते नुतनीकरण करण्यात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना आज दिल्लीच तख्त राखतो-
शिवसेना या चार अक्षरांमुळे मला तुम्हाला ओळख असून महाराष्ट्राला शिवसेनेने ओळख मिळवून दिली. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर मुंबईनंतर ते देवळाली गावातील शिवसेना शाखेच्या ओपनिंग साठी इथे आले होते. बाळासाहेबांमुळे नगरसेवकांपासून अनेकजण मंत्री झाले. शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री असून दिल्लीच तख्त पण आपण राखतो आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पक्ष प्रवेश लांबणीवर पडले-
दरम्यान राऊत यांच्या दौऱ्यामध्ये काही भाजप नेते हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र हे पक्ष प्रवेश लांबणीवर पडले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र पक्षप्रवेश वगळता शिवसेना नेते खासदार संजय राऊत आपला नियोजित दौरा ठरल्याप्रमाणे पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख विजय करंजकर विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते माजी मंत्री बबन घोलप यांचा विविध शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
हेही वाचा- राष्ट्रवादीचे लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर; शरद पवारांनी घेतला आढावा