नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठ थोपटून कौतुक केले आहे.
- पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केले कौतुक -
केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादानंतर नाशिक हे घडामोडींचे मुख्य केंद्र राहिले होते. त्यामुळे या वादात शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून भाजपच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी खासदार राऊत हे नाशिकमध्ये आले होते. याचवेळी सकाळी त्यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन दीपक पांडेय यांची भेट घेऊन कौतुक केले आहे.
- रात्री १ वाजता राणेंविरुद्ध तक्रार -
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत आले होते. यासंदर्भात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी २३ ऑगस्ट रात्री १ वाजता राणेंविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राणेंवर सर्वप्रथम नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पांडेय यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राणेंच्या अटकेचे आदेश दिले होते. याबाबत स्वत: पांडेय यांनी पत्रकार परिषदेद्वारे राणेंच्या अटकेच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले होते.
नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी यांनाही सर्व माहिती दिली जाईल. घटनेनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर गुन्हेगारी केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. पण बाकी सदस्यांना अटक करता येऊ शकते. त्यामुळे राणेंच्या अटकेच्या आदेशाचा निर्णय घेतला, असे पांडेय यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा - नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत