नाशिक - देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत कधीही येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढवली जात नाही. त्याचप्रमाणे २०१४ च्या निवडणुकीपूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे ५ वर्षांत पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
मोदी सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार आहे. या देशाचा पंतप्रधान आजही लोकशाही मार्गाने निवडून येतो. त्या पद्धतीने मोदी निवडून आलेले आहेत. इंदिरा गांधींनी हुकूमशाही पद्धतीने काम केले, असे लोकांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींनासुद्धा पराभूत केले होते. मात्र, त्याच इंदिरा गांधींना लोकांनी परत निवडून दिले. देशातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
राजकीय विरोधक मोदींना हुकूमशहा, हिटलर म्हणतात. मात्र, हुकूमशहा त्यांच्यावर केलेले वाईट भाष्य सहन करीत नाही. मोदी किंवा देशाचे राजकारणी आपल्यावर केलेली टीका सहन करतात आणि त्याचे लोकशाही पद्धतीने उत्तर देतात. याचाच अर्थ या देशामध्ये लोकशाही आहे. पंतप्रधान मोदी या लोकशाहीचे पालन करत असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाहीतर मी अनेकवेळा मोदींवर टीका केली आहे. मात्र, मोदी प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलतात. मिठी मारतात. हेच या देशातील चांगल्या लोकशाहीचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर आणि जातीपातीवर बोलण्यावर भर दिला. सर्व सभा राजकीय असल्यामुळे मोदी ज्या राज्यात जातात तेथील राजकारण्यांवर बोलतात. शासकीय सभा असेल तर विकासावर बोलतील, असे ते म्हणाले.