नाशिक - तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण करणारे कोणाचे समर्थक आहेत का, याची चौकशी सरकारने करावी. संस्कृती रक्षकांचा हेतू चांगला असतो, मात्र काही गैरफायदा घेतात. याबाबत एकनाथ शिंदे यांना कळवले असून आरोपींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'पोलिसांचे खच्चीकरण करू नये'
सोशल मीडियाबरोबर पोलीस महासंचालक यांना मेल करायला हवे होते. तो मेल दाखवल्यावर तक्रार झाली असती. मेडिकलला गेले नाही म्हणून तक्रार घेतली नाही, की डिस्करेज केले याचा तपास करावा. स्थानिक पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर डीजींना पत्र द्यायला हवे. पोलिसांचे खच्चीकरण करू नये, असे त्या म्हणाल्या.
'भावनांचा विमा काढून यावा'
भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबाबत बोलताना गुन्हा दाखल झाला तर डगमगण्याचे कारण काय, असे गुन्हे दाखल होत असतात. माझ्याबाबतही असे प्रसंग घडले आहेत. एवढे मोठे अवडंबर करण्याचे कारण नाही. भांडवल करू नये, राजकारणामध्ये येताना भावनांचा विमा काढून यावा, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
'जबाबदारीची भूमिका निभवावी लागणार'
कोरोनाकाळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत शासनाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबवून जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळात कोरोनामुक्तीसाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, लसीकरण, अर्थकारण सांभाळताना या संकटात सर्वस्व गमावलेल्यांना मानसिक आधाराचा एक कवडसा म्हणूनही जबाबदारीची भूमिका आपल्याला निभवावी लागणार असल्याची भावनिक साद त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना घातली.