मालेगाव (नाशिक) - चीन-भारत सीमेवर सुरू असलेल्या तणावात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावातील सुपुत्र सचिन मोरे हे हुतात्मा झाले आहेत. सचिन मोरे यांच्या निधनाच्या बातमीने या छोट्याशा गावावर आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. शनिवारी सचिन मोरे यांचे पार्थिव गावी आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चिनी सैनिकांकडून घुसखोरीच्या घटना वाढल्याने लडाखच्या गलवान खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. याठिकाणी झालेल्या घटनेत 20 भारतीय जवान या अगोदरच वीरगतीस प्राप्त झाले आहेत. ही घटना ताजी असतानातच चीनने नदीच्या पाण्याचा हत्याराप्रमाणे वापर केल्यामुळे मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप येथील सचिन मोरे या जवानाला वीरमरण आले आहे.
हेही वाचा... आणीबाणी @ ४५ : स्वतंत्र भारताच्या 'या' विवादास्पद काळाचा आढावा
भारत-चीन सीमेलगत भागात नदीवर पूल बांधणीचे काम सुरू असताना चीनने रोखलेला पाण्याचा प्रवाह अचानक सोडला. अचानक पाणी पातळी वाढल्याने प्रवाहात तीन भारतीय जवान त्यात सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, खाली मोठ्या दगडावर पडल्याने त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
हुतात्मा सचिन मोरे हे एसपी- ११५ रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे १७ वर्ष अभियांत्रिकी विभागात ते कार्यरत होते. सचिन मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे. सचिन मोरे यांचे पार्थिव शनिवारी साकुरी येथे आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.