नाशिक - पाच दिवसांन पासून नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक धरणं भरली आहेत. 24 पैकी 7 धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
नाशिक जिल्ह्यात पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने. धरण साठ्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरण 80 टक्के तर दारणा धरण 87 टक्के भरले आहे. गंगापूर धरणातून 7 हजार 833 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, तर, दारणा धरणातून 13500 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सर्वाधिक नांदूर-मध्यमेश्वर या धरणातून 54 हजार 845 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास गंगापूर धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग केला जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसात पहिल्यांदाच गंगापूर धरणातून 7 हजार 833 क्युसेस पाणी सोडल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जायकवाडीकडे आतापर्यंत अडीच ते तीन टीएमसी पाणी गेले आहे.
इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत 2327 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या 70 टक्के आहे. पाऊस सुरूच असल्याने धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील सर्व धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाज आहे. मुबलक पाण्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.
आता पर्यत नाशिक तालुक्यात 92.90 टक्के इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्यात 70.01 टक्के इतका पाऊस झाला आहे, तर सर्वाधिक कमी पाऊस 23.49 टक्के कळवण तालुक्यात झाला आहे. कळवण सह देवळा, नांदगाव,चांदवड हे तालुके चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.