नाशिक - ट्रेकिंगसाठी नाशिककरांच मुख्य आकर्षण असलेल्या पांडवलेणी येथे 3 मित्र अडकून पडल्याची घटना घडली. आज दुपारी बाराच्या सुमारास डोंगराच्या मागील बाजूने ट्रेकिंग करताना चक्कर आल्याने तिघेजण झुडूपात पडले. शुद्धीत आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे अग्निशामक दल, पोलीस, गिर्यारोहक यांची तत्काळ मदत पोहोचू शकली; आणि तिघांचे प्राण वाचले. तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची सुखरुप सुटका झाली.
आयुष, सुमित, समर्थ हे तीन शालेय विद्यार्थी सकाळच्या सुमारास पांडवलेणी परिसरातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. डोंगर चढत असताना त्यांना काही त्रास जाणवला नाही. मात्र सूर्य डोक्यावर आल्यानंतर त्यांना भोवळ आली. यानंतर ते झुडूपात अडकून पडले. शुद्ध आल्यानंतर तिघांनी आरडाओरडा सुरू केला. यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचा आवाज ऐकला. याची तत्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीला गिर्यारोहक टीमही पोहोचली. यानंतर रेस्क्यू ऑपरेशला सुरुवात झाली. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर या मुलांना बाहेर काढण्यात यश आले.
पांडवलेणी परिसरात या अगोदर देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु ट्रेकिंग करताना नियम कोणीही पाळत नसल्याले अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सावधान राहण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे यांनी केले आहे.