नाशिक - रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारांना विमा कवच देण्यात यावे. विविध योजनेतील अन्नधान्य वाटपात कमिशन देण्यात यावे, या मागणीसाठी आज (सोमवार) संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला आहे. जून महिन्यापासून दुकानदारांनी अन्नधान्य उचण्यास नकार दिला आहे. सध्या मे महिन्यातील अन्नधान्य वाटप सुरू ठेवण्यासाठी त्यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याची तयारी केल्याने शासन अडचणीत आले आहे.
हेही वाचा... यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 'समान काम समान वेतन'चा नारा; डॉक्टरांचे मानधनासाठी आंदोलन
रेशन दुकानदारांना विमासुरक्षा कवच देण्यात यावे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्यवाटपात कमिशन देण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांचा अंगठा नामनिर्देशित म्हणून ग्राह्य धरावा, यांसह विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी असहकार पुकारला आहे. शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी यासाठी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन अध्यक्ष गजानन बाबर यांनी एक जूनपासून रेशन दुकानदारांनी धान्य उचल आणि वितरण बंद केले आहे. याबाबत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी अधिक माहिती दिली आहे.
रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, यासाठी जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने जिल्हाभरातील रेशन दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे आता प्रशासन याबाबत नेमका काय निर्णय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.