नाशिक - 'हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी', 'सीट बेल्ट लावा, अपघात टाळा' तसेच 'आपली कोणी तरी वाट पाहतयं' अशा प्रकारचा संदेश देत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांना राख्या बांधण्यात आल्या. शहरातील जीबीएस या सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केले. या उपक्रमाला नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
स्वातंत्र्य दिनाचे आणि रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांना 'मस्ती की पाठशाळा' प्रकल्पातील मुलांच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या. हा जनजागृतीपर कार्यक्रम नाशिकच्या औरंगाबाद नाका चौकात पार पडला. बांधल्या गेलेल्या राख्या या संस्थेच्या चिमुकल्यांनी स्वतः तयार केल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून वाहतुकीसंदर्भातील आदर्श उपक्रम समाजासमोर ठेवण्यात आला आहे.
अनेक रिक्षाचालकांनी व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच चिमुकल्यांकडून राख्याही बांधून घेतल्या. उपक्रमात वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार तसेच जीबीएस एनजीओच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, संस्थेचे स्वयंसेवी तुषार धुमाळ, अभिजीत तांबे, कैलास जाधव, रत्ना दिवे, शैलेंद्र भारती, रितू कदम, शशिकांत गोसावी, समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा आहेर, कविता गावित आदींनी परिश्रम घेतले.