Intro:
दिंडोरी ( नाशिक ) - नाशिक जिल्ह्यात सर्वच भाजीपाल्याचे व फळभाज्यांचे भाव प्रचंड गडगडले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला मार्केटमध्ये तेजी होती. लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे असे मत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिंडोरी येथील चिंचखेड येथे व्यक्त केले. परंतु थोडेसे उत्पादन वाढले अन भाव पूर्ण गडगडले. हे नेहमीच घडत असते. मागील पिकात मिळालेले पैसे पुढील पीक घेऊन बुडते.
प्रक्रिया उद्योगात संशोधनाचा गरज
शेतकरी नेहमी अडचणीत येतो. यासाठी आज जगात मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. मोठे उत्पादन येते त्या काळात भाजीपाल्याची टिकाऊ क्षमता वाढविणे, फळ व फळभाज्यांचे वेगवेगळे टिकाऊ उत्पादने तयार करणे, त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे व टंचाईच्या काळात प्रत्येक ग्राहकांपर्यंत देशातील ही उत्पादने पोहचविण्याची प्रभावी वितरण प्रणाली उभी करणे गरजेचे आहे. तरच जास्त उत्पादन बाजारात आले तरी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. शेतमालाचा तुटवडा झाला तरी ग्राहकांना योग्य भावात मुबलक भाजीपाला व फळभाज्या उपलब्ध होतील.
योग्य बाजारपेठ शोधावी लागेल
यासाठी जागतिक संशोधन व इतर प्रणालीचा अभ्यास करून महाराष्ट्राला वाटचाल करावी लागेल. त्यातून निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जगातील योग्य बाजारपेठाचादेखील शोध घ्यावा लागेल. निर्यातीला मतपेटीला बळी न पडता प्रोत्साहन द्यावे लागेल. तेव्हाच इथला शेतकरी भरडला जाणार नाही व देशाची गंगाजळी वाढविण्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी देखील मोठा हातभार लावतील. परंतु यासाठी शेतीवर फक्त घोषणांचा पाऊस पाडून उपयोग नाही तर मोठ्या आमूलाग्र व अभ्यासपूर्ण दिशा बदलाची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी असे मत व्यक्त केले.