नाशिक - दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यंदा बाजारात कमी आवाज करणारे तसेच कमी वायू प्रदूषण करणारे ग्रीन फटाके दाखल झाले आहेत. मात्र, हे फटाके खरेदी करताना ग्राहकांना 10 ते 15 टक्के अधिक रक्कम मोजावी लागत आहे.
नाशिकमध्ये दिवाळी निमित्ताने उत्सवाचे वातावरण आहे. अशात आकाशकंदील, फराळ, कपडे खरेदीसोबत दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी नागरिक फटाक्यांची खरेदी करत आहेत. यासाठी शहरात महानगर पालिकेने नेमून दिलेल्या मोकळ्या मैदानात फटाके स्टॉल थाटण्यात आले आहेत. यंदाच्या दिवाळीत कमी प्रदूषण व्हावे यासाठी बाजारात ग्रीन फटाके दाखल झाले आहेतत. पर्यावरणपूरक व कमी आवाज होणाऱ्या या ग्रीन फटाक्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे.
- हे आहेत ग्रीन फटाके -
ग्रीन फटाक्यांमध्ये ग्राऊड चक्र, फुलझडी, सेवन शॉट, बटर फ्लाय, कलर पेन्सिल, पॉपधमाका, लेस, रॉकेट, सुरसुरी, लेझर शो, फ्लाय मशीन, कलर फॉग एग आदी फटाक्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे.
हेही वाचा - Diwali 2021 : 'इथे' बनतात साडीपासून इको फ्रेंडली आकर्षक आकाशकंदील; बाजारात मोठी मागणी
- कमी आवाजाच्या फटाक्यांना पसंती -
दिवाळीत फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. त्यामुळे सगळेच दरवर्षी फटाके फोडत असतात. मात्र, या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढत आहे. फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो. मात्र, यंदा कमी आवाज आणि कमी प्रदूषण होणारे ग्रीन फटाके बाजारात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी नागरिक फटाके स्टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत.
- प्रदूषण कमी होणार -
काही वर्षांपूर्वी फटाक्यांमुळे वाढत्या प्रदूषणाचा विचार करून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने अशा प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांवर संशोधन केले होते. त्यानंतर फटाके बनवणाऱ्या कंपन्यांनीही या प्रकारचे फटाके तयार करण्यासाठी सहमती दर्शवली. २०१९ पासून हे ग्रीन फटाके बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. या फटाक्यांमध्ये धूळ शोषून घेण्याची क्षमता असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
- ग्रीन फटाके म्हणजे काय?
ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होते, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन फटाके असे म्हटले जाते. हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांप्रमाणेच दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्कायशॉट असे प्रकार असतात. हे फटाकेही काडेपेटीच्या मदतीनेच उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाकेही असतात.
- ग्रीन फटाक्यांमध्ये काय असते?
ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण सरासरी 30 ते 40 टक्के कमी होऊ शकते. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायने नसतात. त्यात अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशिअम नायट्रेट आणि कार्बन वापरले जात नाही. हे घटक वापरलेले असले, तरी त्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वायू प्रदूषण कमी होते. या फटाक्यांमुळे रोषणाईही होते. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच असतात. मात्र, ते पर्यावरणपूरक असतात.
हेही वाचा - Diwali 2021 : दिवाळी साजरी करण्यामागे काय आहेत पौराणिक कथा? जाणून घ्या....