नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक येथे हजेरी लावली. यावेळी नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचे आवाहन केले.
महाजनादेश यात्रेच्या समोरोप सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवारांना भारताचा शेजारील देश आवडतो - मोदी
मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केले जाणे हे दुर्देवी असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले. “काँग्रेस गोंधळले आहे, हे आपण समजू शकतो पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता मतांसाठी चुकीचे विधान करत असेल तर फार दुख होते. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो, ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, की दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असा शब्दात नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली.
हेही वाचा... उद्धव यांचे नाव न घेता 'बयानबहादूर', 'बडबोले' म्हणत मोदींचा शिवसेनेला टोला
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राष्ट्रहित नाही - मोदी
राजकारणात आरोपप्रत्यारोप होत असतात, पण देशाची विजयी पताका आपल्याच हातात असते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राष्ट्रहित नाही, या पक्षांचे नेते काश्मीर मुद्द्यावर राजकारण करत आहेत.
हेही वाचा... कसब्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेस देणार का धक्का? इच्छुकांची गर्दी वाढवणार भाजपची डोकेदुखी
नाशिकमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी भाजपात नुकतेच दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले या सभेत व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, आशिष शेलार, पंकजा मुंढे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन आदि नेते यावेळी उपस्थित होते.