नाशिक - पीएफआयकडून राम मंदिर पाडून बाबरी उभारण्याचा डाव एटीएसच्या तपासात उघडकीस आला आहे. पीआयएफ मॉड्यूल 2047 मध्ये हे तडीस नेण्याची आखणी आतापासूनच करत होते. एटीएसच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. पीआयएफच्या अटक केलेल्या संशयितांकडून ही माहिती मिळाली आहे. एटीएसने नाशिक न्यायालयात ही माहिती दिली.
देश विघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पीएफआयच्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिक्समध्ये मॉड्यूल 2047 पर्यंत राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा तसेच भारत देश संपूर्ण मुस्लिम राष्ट्र बनवण्याच्या डाव आखण्यात आल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी नाशिकच्या न्यायालयात दिली आहे.
हे आहेत आरोपी दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यासह समाजात अशांतता पसरवण्याचा कट रचल्याच्या संशयावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) मालेगावतून दोन आणि राज्यातून इतर तिघांना एटीएसने अटक केली होती. त्यामध्ये पीएफआय च्या वादग्रस्त संघटनेच्या मालेगाव जिल्हाध्यक्ष मौलाना सईद अहमद अन्सारी यासह पुण्यातील उपाध्यक्ष अब्दुल कयूम शेख,वरिष्ठ नेता रझीअहमद खान,बीड मधून सदस्य वसीम शेख ना आणि कोल्हापुरातून विभागीय सचिव मौला नबीसाब मुल्ला यांचा समावेश आहे.
सोशल मीडियाचा केला जातो मोठ्या प्रमाणात वापर - युवकांना दहशतवादी कारवाईसी जोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विशेषतः जगात घडलेल्या काही घटनांना एडिट करून युवकांना चुकीची माहिती पुरवण्यात येते. मुस्लिम धर्मियांवर किती अन्याय अत्याचार केला जातो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार अशा पद्धतीने सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा माहिती प्रसारित करून युवकांच्या मनात द्वेष निर्माण होऊन, ते दहशतवादी संघटनांशी कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर काही निर्बंध असणे किंवा त्याची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. यासाठी युवकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.
मदरशांची संख्या अधिक - मराठवाड्यात मदरशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात औरंगाबादमध्ये ही संख्या अधिक मानली जाते. काही मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. मात्र आजही काही मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण चुकीच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच जातीय तेढ निर्माण करून हिंसक कारवायांमध्ये, संघटित गुन्हेगारी करण्यासाठी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पैसे पुरवले जातात. अशावेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या या संघटना मदत करतात. ही बाब भविष्यात अधिक धोक्याची असल्याचं मत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केली.
अन्य धर्मांंधांचाही धोका - औरंगाबाद जिल्ह्यात दहशतवादी कारवांशी असलेले अनेक पुरावे आजपर्यंत समोर आले. यामध्ये एटीएस आणि इतर तपास यंत्रणांकडून होणारी कारवाई चर्चेचा विषय राहिल्या आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईने पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी, मुस्लिम दहशतवाद बरोबर अन्य धर्मांध देखील मोठ्या प्रमाणात फळी उभारण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः दाभोळकर यांच्या हत्येची पाळमुळ औरंगाबाद पासून जोडली गेली. त्यामुळे येणारा काळामध्ये देशाला वाचवण्यासाठी सर्व धर्मांध दहशतवाद्यांशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यासाठी सोशल मीडियावर नियंत्रण असणे, पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची, त्याचबरोबर जनतेने देखील सहकार्य करणे गरजेचे आहे.