नाशिक :- नाशिक आगारातून सुरू करण्यात आलेल्या एसटीला आता जिल्ह्यात लक्ष्य केले जात आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या तीन एसटीवर अज्ञातकडून दगडफेक झाल्याच्या घटना उमराणा ते सौंदाणा या पाच किलोमीटर अंतरात समोर आल्या आहे.
दगडफेकीच्या घटनेने चालक धास्तावले
देवळा तालुक्यातील उमराणे येथील सांगवी फाट्यावर नाशिकवरून धुळ्याकडे जाणाऱ्या निमआराम बसवर दगडफेक करण्यात आली.या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला. तर मालेगावच्या सौंदाणे शिवारातील सब स्टेशन व म्हसोबा मंदिराजवळ एसटीवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही प्रवाशी जखमी झाले नाही.या प्रकरणी देवळा व मालेगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दगडफेकीच्या घटनेने चालक धास्तावले आहे. कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आता संशयावरून त्या परिसरातील एसटी चालक - वाहकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात एसटी कामगारांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने समन्वयाची भूमिका घ्यावी - प्रवीण दरेकर