नाशिक - पहिल्याच जोरदार पावसामुळे नाशिक शहरातील बऱ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पावसामुळे उखडल्याने महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे नाशिक शहर पहिल्याच पावसाने खड्डेमय झालं आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. देशातील 100 स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी महानगरपालिका, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड, सारडा सर्कल, मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक, द्वारका, इंदिरानगर, सिडको, सातपूर आदी परिसरातील रस्ते पावसामुळे खड्डेमय झाले आहेत.
या खड्ड्यांमुळे रस्त्यात वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टेलिकॉम कंपनीच्या भूमिगत केबल टाकण्याच्या साठी आणि भूमिगत गटारी साठी रस्त्यामध्ये खोदकाम करण्यात आले आहे.या नंतर रस्त्यावर तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या पावसामुळे डांबरीकरण उखडून गेले असून रस्त्यात मोठी खड्डे तयार झाले आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करून हे जीवघेणे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.