नाशिक - अनेकदा रक्त पाहिजे आहे म्हणून सामाजिक बांधिलकीतून अनेकजण सोशल मीडियावर मेसेज पाठवत असतात. असाच एक रक्तगट म्हणजे 'पी नल', अतिशय दुर्मिळ असलेला पी नल रक्तगटाची गरज केरळ येथील एका रुग्णास भासली. दरम्यान, हा रक्तगट केरळमध्ये मिळाला नाही. मात्र, नाशिकमध्ये हे रक्त उपलब्ध झाल्याने ही रक्तपिशवी थेट केरळला विमानाने पाठवत रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
रक्त कुठे तयार करता येत नाही, ते एखादी व्यक्तीच दुसऱ्याला मदत म्हणून रक्तदान करू शकते. म्हणून रक्तदान करावे यासाठी शासन तसेच सामाजिक संस्थांकडून नेहमीच आवाहन केले जाते. माणसातील काही रक्तगट हे अतिशय दुर्मिळ आहेत, जे लाखात एखाद्या व्यक्तीचे असतात. यातील एक रक्तगट म्हणजे 'पी नल'
केरळमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याला रक्ताची गरज भासली. मात्र, त्याचा पी नल रक्तगट हा अतिशय दुर्मिळ असल्याने केरळमध्ये कुठेच मिळाला नाही. अशात आयसीएमआर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्मुनो हिमाटोलॉजीच्या डॉ. स्वाती कुलकर्णी व एम्स हॉस्पिटलच्या डॉ. विना शिनॉय यांच्या मदतीने हा रक्तगट नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आढळून आला.
याबाबत अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी रक्तदात्याशी संपर्क साधून त्यास रक्ताची असलेली गरज पटवून सांगत रक्तदान करण्याची विनंती केली. त्या युवकानेही रक्तादानसाठी तयारी दर्शवल्यानंतर त्यास अर्पण रक्तपेढीच्या वाहनातून नाशिकला आणण्यात आले. रक्ताच्या संपूर्ण चाचण्या केल्यानंतर, पी नल राक्तपिशवीला विशिष्ट पद्धतीने पॅकिंग करून ते विमानाने केरळला पाठवण्यात आले.