नाशिक - कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नामांकित डॉ शब्बीर इंदोरवाला यांच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 150 रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात 3 रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 35 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे.
नाशिकमध्ये मागील दोन महिन्यात कोरोनाने उद्रेक केला होता. अशात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 46 हजारांवर जाऊन पोहचला होता. या कोरोनाने शेकडो जणांचा बळी देखील घेतला. मात्र, आता कोरोनामुक्त झालेल्या मधुमेह असलेल्या काही रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. या आजारात रुग्णांच्या नाकात, डोळ्यात बुरशी येत जखमा होत असून, या आजारावर वेळेवर उपचार केले नाही तर रुग्णांचे डोळे आणि दात काढावे लागत आहेत. तसेंच वेळेवर उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याचे मत नाशिकचे प्रसिद्ध कान, नाक, घशाचे तज्ज्ञ डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांनी म्हटले आहे.
तीन रुग्णांचा मृत्यू -
उत्तर महाराष्ट्रात कान, नाक, घशाच्या आजारांवर उपचार करणारे डॉ. शब्बीर इंदोरवाला यांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये मागील दोन महिन्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे 150 रुग्ण दाखल झाले होते. त्यात उपचारा दरम्यान अनेक रुग्णांचे डोळे, दात काढण्यात आले असून वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेशात जमावाकडून जिवघेणा हल्ला, वाहनांची तोडफोड
म्यूकरमायकोसिस आजाराचे थैमान
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्यूकरमायकोसिस हा आजार नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत मधुमेही कोविड रुग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा संसर्गजन्य आजार नसून, मात्र वेळीच त्याचे निदान होवून त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण कायमस्वरुपी बरा होवू शकतो, अथवा रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे सांगायचे झाल्यास, कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान-नाक-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते, असे मत डॉ. शब्बीर इंदोरवाला यानी व्यक्त केले.
रेमडेसिवीर दिले आणि त्रास झाला?
माझ्या कुटुंबातील सदस्य एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले. मात्र, तिसऱ्या इंजेक्शननंतर असे लक्षात आले की डाव्या गालाचा आणि नाकाला संवेदना येत नव्हते. आम्ही याबाबत कान, नाक, घसा तज्ज्ञांना दाखवले तेव्हा लक्षात आलं की नाकात बुरशीजन्य फंग्स झाला आहे. डॉक्टरांनी यावर त्वरित उपचार करून ऑपरेशन केले. आता 10 दिवस झाले असून, आमच्या पेशंटची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सागितले आहे.
वेळेवर उपचार घेतल्यास वाचू शकतो प्राण
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उद्रेक केला आहे. मागील दोन महिन्यात लाखांहून अधिक जण कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरसुद्धा नाशिककरांची चिंता वाढली आहे. म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव वाढतं आहे. या आजारात नाकातील बुरशीजन्य (फंगस) या नवीन आजाराने डोके वर काढले असून, हा आजार झाल्यानंतर त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. उपचार वेळेत न घेतल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोरोना झालेला आहे व मधुमेह देखील आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन ई.एन.टी इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध नाक-कान- घसा तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी केले आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती