नाशिक - जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी येत आहे. त्यामुळे कोविड सेंटर हळूहळू रिकामे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, मात्र दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेकडून अँटीजेन टेस्ट बंद करण्यात आल्याने नव्याने रुग्ण संख्या कमी येत असल्याचं म्हटलं जातं आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि कोविड सेंटर रिकामी झाली आहेत. नाशिकच्या ठक्कर डोममध्ये 300 बेडचे कोविड सेंटर असून याठिकाणी सद्य स्थितीत फक्त 40 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हाच आकडा महिन्याभरापूर्वी 10 हजार इतका होता.
अँटिजेन चाचण्या बंद -
रुग्ण संख्या कमी होत आहे, मात्र असं असलं तरी दुसरीकडे मनपाकडून नागरिकांची मोफत होणारी अँटिजेन टेस्ट बंद करण्यात आल्याने रुग्णांचे कोरोनाचे निदान होत नसल्याने नव्यानं मिळून येणाऱ्या रुग्ण संख्येत घट झाल्याचे बोलले जात आहे. तसेच दिवाळी काळात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजरपेठेत तुडुंब गर्दी केल्याने येणाऱ्या काही दिवसात कोरोनाबधितांचा आकडा वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती
- आतापर्यंत मिळून आलेले रुग्ण-95 हजार 744
- कोरोना मुक्त झालेले नागरिक-91 हजार 236
- उपचार घेत असलेले नागरिक- 2 हजार 801
- एकूण मृत्यू -1 हजार 707
बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.38%, नाशिक शहरात 95.80%, मालेगावमध्ये 9335 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.61 टक्के आहे तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के इतके आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण -
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 110, चांदवड 36, सिन्नर 340, दिंडोरी 78, निफाड 111, देवळा 8,नांदगाव 54, येवला 27, त्र्यंबकेश्वर 30, सुरगाणा 3, कळवण 8,बागलान 44,इगतपुरी 22, मालेगाव ग्रामीण 47 अशा एकूण 922 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 762, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 109 तर जिल्ह्याबाहेरील 8 असे एकूण 2 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत..
कोरोनामुळे झालेले मृत्यू -
नाशिक ग्रामीण 622, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 876, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 170, जिल्ह्याबाहेरील 39, अशा एकूण 1 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.