नाशिक - कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना ऐन थंडीत रुग्णालयातच फरशीवर झोपविल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघड झाला आहे. शस्त्रक्रिया केलेल्या या महिलांना किमान पाच ते सात दिवस रुग्णालयात देखभाल आणि उपचार करावे लागतात. असे असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रात चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा महिलांना चक्क थंडगार फरशीवर झोपविण्यात आले होते.
बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी अहवाल सादर करून याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यातआल्या असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले आहे.
दोषी आढळून येणाऱ्यांवर काय कारवाई होणार?
प्रत्यक्षात शिरसगाव आरोग्य केंद्रासाठी १५० महिला कुटुंब नियोजन टार्गेट असतांना हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य क्षमेतेपेक्षा दुप्पट शस्त्रक्रिया करून स्तनदा मातांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. दरम्यान या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे यात दोषी आढळून येणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये एक संतापजनक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान महिला कुटुंब नियोजन शस्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत शस्रक्रिया सुरू झाल्या. मात्र यावेळी थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने दिलेल्या नियमांना डावलून त्र्यंबकेश्वरमधील शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर थेट फरशीवर झोपायला लावल्याचा प्रकार हरसुलच्या जिल्हा परिषद सदस्या रुपाली माळेकर आणि पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे यांनी रात्री एक वाजता आरोग्य केंद्राला अचानक दिलेल्या भेटीमुळे समोर आला. सदस्या रुपाली माळेकर आणि सभापती मोतीराम दिवे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी मध्यरात्री महिला कुटुंब नियोजन शस्रक्रिया झालेल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वार्डात कुठल्याही निर्जंतुकीकरणाची सुविधा न पार पाडताच फरशीवर अंथरून टाकून महिला रुग्णांना झोपविण्यात आले होते.