नाशिक - कांदा प्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आजपासून लासलगावसह राज्यभरातील बंद असलेले कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत. आता कांदा कोंडी सुटल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव आणि अन्य बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून कांदा लिलाव शेतकरी आणि व्यापार्यांनी बंद पाडले होते. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी व 25 मेट्रिक टन साठवणूक या निर्बंधांच्या विरोधात शेतकरी व व्यापार्यांनी वज्रमूठ उभारत लिलाव बंद पाडले. त्यामुळे लिलावाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती. कांदा लिलाव बंद झाल्यामुळे बाजारपेठेत कांदा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलोवर पोहोचला आहेत. परिणामी सर्व सामान्य जनतेच्या स्वयंपाकगृहातून कांदा हद्दपार झाला होता.
पवार, ठाकरेंच्या आश्वासनानंतर लिलाव सुरू-
मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी शेतकरी व व्यापार्यांशी चर्चा करुन केंद्रासोबत चर्चा करुन निर्यातबंदी उठविण्यासाठी आणि साठवणूक मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. तसेच व्यापार हा व्यवस्थित सुरू राहिलाच पाहिजे. व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याबाबत फेरविचार करावा, असे आवाहन करत मार्केटमधल्या ज्या अडचणी आहेत त्या एकत्र बसून सोडवण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होणार आहेत. लासलगाव बाजार समितीत देखील लिलाव नेहमीप्रमाणे सुरू होतील अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभुमीवर कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प
जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख 15 कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सलग चार दिवसांपासून बंद होते. कांद्याचे लिलाव बंद असल्यानं चार दिवसांत 100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दिपावली सणाचे खरेदीकरीता हा कालावधी कांदा अगर शेतीमाल विक्रीकरीता महत्वाचा असतो. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती.