नाशिक- हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असताना नाशिकमध्ये सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशियत नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह भाडेतत्वावर घर घेऊन राहायला आले होते. याठिकाणी पुर्वीपासून राहत असलेल्या कैलास रामू कोकणी (२३) याने कुटुंबातील एका सात वर्षाच्या बालिकेला खाऊ देण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करत बालिकेवर अत्याचार केला.
काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती घरात सापडली नाही. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या कोकणीला याबाबत विचारणा करण्यासाठी पीडित बालिकेच्या आईने हाक मारली. संशयित कोकणी याने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने तात्काळ आईला घडलेला प्रकार रडत रडत सांगितला.
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी यास बेदीम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून संशयित कोकणी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत कोकणीविरूध्द बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.