नाशिक - शरहातील जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. नाशिक मधील सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले.
जुन्या नाशिक परिसरातील सुकेनकर लेनमध्ये सोन्या मारुती मंदिराजवळचा जीर्ण झालेला पवार वाडा आज दुपारच्या सुमारास कोसळला. नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे शहरात पुन्हा एक वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाड्याची भिंत कोसळल्याने वाड्याबाहेर उभी असलेली रिक्षा विटा आणि मातीने दबली गेली होती आणि या रिक्षामध्ये बसलेला रिक्षाचालक कृष्णांत या घटनेत जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वाडा कोसळण्याची माहिती मिळताच पंचवटी विभागाच्या अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाड्यातील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.