नाशिक - कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलात भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असताना दुसरीकडे पोलीस दलातही दिवसागणिक बाधितांची वाढ होत असल्याने पोलीस दल पूर्णतः हादरून गेले आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना हवी तशी सुरक्षा मिळत नसल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे.
'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य. कुठल्याही संकटाशी सामना करण्यासाठी पोलीस सज्ज असतात. मात्र, हेच पोलीस दल कोरोनाशी संघर्ष करताना हादरून गेले. एकट्या मालेगावमध्ये तर कोरोनाबाधित पोलिसांनी दिडशेचा पल्ला गाठला आहे. त्यात एसआरपीएफच्या जवानांचा देखील समावेश आहे. संपर्कात आलेला बाधित पोलीस ज्यावेळी उपचार घेतो, त्यावेळी इतरांना मात्र कर्तव्यावर हजर व्हावे लागते, ही वस्तुस्थिती असताना वरीष्ठ अधिकारी मात्र पोलिसांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी औषधे आणि सुरक्षेसाठी सगळे काही दिले जात असल्याचा खुलासा करत विषयाला बगल देत आहेत.
पोलिसांना कंटेन्मेंट झोन, रेड झोनमध्ये बंदोबस्त करावा लागतो. मानसिक तणावात वावरत असताना आरोग्य विभागाचे फारसे लक्ष नाही. आरोग्यमंत्री जरी दावा करत असले तरी प्रत्यक्षात पोलिसांना पीपीई किट, ग्लोज, उत्तम दर्जाचे मास्क अशी सुविधा मालेगावसारख्या ठिकाणी तरी आवश्यक आहे. मात्र, यावर ठोस भूमिका न घेता आरोग्यमंत्रीही वेळ मारून नेत आहेत.
मालेगावमधील परिस्थिती गंभीर असून ती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यात काम करणाऱ्या पोलीस दलाला सर्वाधिक फटका बसतोय. मरणाच्या दारात तर आपण उभे नाही ना? अशी भावना प्रत्येक पोलिसांच्या मनात आहे. पोलीस दलातील रुग्णाची संख्या पाहता राज्यात हा आकडा आठशेच्या वर गेला. त्यात एकट्या मालेगावात दीडशे पोलीस बाधित आहेत. पोलीस कोरोनाबाधितांचा आकडा बघता सरकारी पातळीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.