नाशिक - गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेला आडगावकर आणि खान परिवारातील शुभविवाह आज पार पडला आहे. हिंदू आणि मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे हा विवाह संपन्न झाला. अनेक हिंदू संघटनांनी या विवाहाला लव्ह जिहादचे नाव देत हा विवाह होऊ न देण्याचा इशारा दिला होता, मात्र धर्मांधांच्या विरोधाला झुगारून हा विवाह संपन्न झाला आहे.
हेही वाचा - हिंदु-मुस्लीम जोडप्याचा विवाह; जयंतीनिमित्त शिवरायांना पाथरीत अनोखा मुजरा
अंनिस, प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित
शुभमंगल सावधानच्या मंत्रोच्चारात आज नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लीम परिवाराचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खान आणि आडगावकर परिवारातील हा विवाह पुरोहित आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे देशभर चर्चिला गेला होता. या विवाह सोहळ्याला हिंदुत्ववाद्यांनी विरोध केल्याने तो रद्द झाला, अशाही वावड्या उठविण्यात आल्या, मात्र आज या दोन्ही परिवाराने धमक्यांना न जुमानता विवाहसोहळा पार पाडला. या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत पाठिंबा दिला.
हेही वाचा - पुण्यात हिंदू महिलेचे अंत्यसंस्कार मुस्लीम पद्धतीने, लक्ष्मीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण
वादाला पूर्णविराम
विवाहसोहळा लव्ह जिहाद असल्याचा हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोहित संघटनांचा आरोप होता. त्यामुळे या लग्न सोहळ्याविरोधात समाज माध्यमांवर हिंदुत्ववादी संघटनांनी मोहीमही राबवली होती. या कॅम्पेनला पुरोगामी संघटनांनी विरोध करत या लग्न सोहळ्याला संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हा लग्नसोहळा देशभर चर्चेत आला होता. वादामुळे हा विवाहसोहळा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आज नाशिकच्या एका हॉटेलमध्ये खान आणि आडगावकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि या वादाला पूर्णविराम मिळाला. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुला-मुलीची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता.