नाशिक - नाशिक महापालिका क्षेत्रात देखील आज रात्री पासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत ही संचारबंदी येत्या 5 जानेवरीपर्यंत असणार आहे.
रात्रीच्या सुमारास फिराल तर, कारवाई होईल
नवीन कोरोना विषाणू आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, नगरपालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करायची की नाही, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही मांढरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरत गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कारण नसताना रात्रीच्या सुमारास कोणी फिरत असतील तर, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - पुण्यात पुन्हा एल्गार परिषद.. 31 डिसेंबरला परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज
पहिल्याच दिवशी शहरात संचारबंदीचा फज्जा
येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाने लागू केलेल्या संचार बंदीचा पहिल्याच दिवशी नाशिक शहरात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, रात्री अकरा वाजल्यानंतरही शहराच्या विविध रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे.
युरोपमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे महाराष्ट्रातदेखील खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यू घोषित केला आहे. यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली नियमावली नाशिक जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे शहरात संचारबंदीचे आदेश असतानाही शहरातील एकाही ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी देखील दिसून न आल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे की नाही, असा संभ्रमात टाकणारा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.
हेही वाचा - युवक क्रांती दलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर आंदोलन