नाशिक- नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार व निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. या जीव हेलावून टाकणाऱ्या घटनेचा निषेध नाशिकमध्ये सुद्धा होत आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून देशात असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून यात गुन्हेगारांवर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे येत्या काळात अशा घटनांना आळा बसवता येणार नसल्याने अशा प्रकरणात न्यायालयाद्वारे कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
महिलांवर अत्याचार करणार्या प्रत्येक नराधमांना एक दोन महिन्यात फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा. अशा वाढत्या घटनांमुळे महिलांना जगणे मुश्कील झाले असून त्यांना घराबाहेर जाणे देखील कठीण झाल्याचे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले. 'बेटी बचाव बेटी पढाव' जाहिरात करणाऱ्यांनी आधी बेटी सुरक्षित करावी. दिवसेंदिवस राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. गृहमंत्र्यांचे गृहखात्यावर नियंत्रण राहिलेले नसून राज्यात न्याय आणि महिला सुरक्षेची जबाबदारी घेता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुद्धा यावेळी महिलांनी केली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिल भामरे ,कार्याध्यक्ष सुषमा अंधारे, सुरेखा निमसे, मीनाक्षी गायकवाड, सुजाता गाढवे ,राखी शेळके, योगिता शिंदे , सलमा शेख, अर्चना कोथमिरे, दीक्षा दोंदे, मंजुषा महेश, वंदना पवार आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थित होती.