नाशिक - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ॲम्बुलन्सला धक्का मारून निषेध आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्यांना एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरामध्ये वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ॲम्बुलन्सला धक्का देत प्रतिकात्मक आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.
नाशिक शहरामध्ये पेट्रोल शंभरच्या घरात असताना, सर्वसामान्यांना एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. याविरोधात मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
'नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या'
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. त्यामुळे डिझेल एकूण 89 रुपये पेट्रोल 100 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांबरोबरच व्यापारीवर्गाचे देखील कंबरडे आता मोडले आहे. मात्र, केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी करण्यास तयार नाही, या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरात ॲम्बुलन्सला धक्का मारून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले, की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच चालल्या आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.