नाशिक - शहर व परिसरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकूण दोन गणेशभक्त बुडाले आहेत, तर चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.
नाशिकमधील गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा येथे तिघेजण बुडाले होते. यातील दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे, तर एक तरुण अजूनही बेपत्ता आहे.
हेही वाचा... रत्नागिरीत गणेश विसर्जनावेळी दोन मुले खाडीपात्रात बुडाली; शोधकार्य सुरू
रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली प्रशांत पाटील (वय ३८) नावाच्या तरुणाने गोदावरीत बाप्पाला निरोप देताना पाण्यात सूर लगावला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला, ही बाब अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांच्या लक्षात येताच जीवरक्षक दीपक जगताप याने नदीत उडी घेतली तर लिडिंग फायरमन इकबाल शेख, घनश्याम इंफाळ, तानाजी भास्कर यांनी राबरी बोटीने पाठलाग सुरू केला. सोमेश्वर धबधब्याच्या परिसरातून जगन्नाथ शर्मा (वय 40), मनोज भारत (वय 42), श्रीवास्तव ( वय 50) या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले आहे.
हेही वाचा... अमरावतीत गणेश विसर्जनावेळी 4 तरूण नदीत बुडाले; शोध सुरू
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे नदीपात्रात विसर्जनासाठी सुमारे पंचवीस जण आले होते. त्यातील चौघे गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरले. यातील तीन जण बाहेर आले परंतु, युवराज राठोड (२८, रा.अंबड) हा वर आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडल्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच तलावात दोन तरुण बुडाले होते, या घटनेची पुनरावृत्ती घडल्याने प्रशासनाच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत युवराजचा शोध घेण्यात आला.
हेही वाचा... वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...
गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रात सुमारे 1 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. तसेच त्रंबकेश्वर भागात देखील पाऊस जोरदार झाल्याने नद्या, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विसर्जनासाठी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले होते.