नाशिक - महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण कोरोना कक्ष येथे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अचानक भेट देऊन रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहाणी केली. त्यांनी कोरोना कक्षात पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद साधला.
नाशिकचे पालिका आयुक्त थेट पीपीई किट घालून कोरोना कक्षात! महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संशयित अथवा कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येते. मनपाच्यावतीने हॉस्पिटलमध्ये योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण येथे पीपीई किट घालून अचानक कोरोना कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाबाधित व कोरोना संशयित रुग्णांशी संवाद साधला. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची चौकशी केली. यामध्ये काढा, गरम पाणी आणि जेवणाची व्यवस्था याबाबत रुग्णांशी चर्चा करून खात्री केली. तसेच रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी होत आहे की नाही, याबाबतची माहिती घेण्यात आली.
महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण कोरोना कक्ष येथे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अचानक भेट देऊन रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहाणी केली. आयुक्तांनी रुग्णालयात औषधांचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची असणारी व्यवस्था याबाबत पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ नितीन रावते यांनी आयुक्तांना रुग्णालयातील व्यवस्थेविषयी माहिती दिली. तसेच समाजकल्याण कोरोना कक्ष येथे जेवणाची व्यवस्थेबाबत पाहणी केली. केटरिंग व्यवस्था आणि जेवणाची पाहाणी करून त्याचा दर्जा सुधारण्याच्या सुचना दिल्या.