नाशिक - वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता नाशिकची वाटचाल टाळेबंदीच्या दिशेने सुरू आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंबंधी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
'...तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते'
मनपाचे दोन मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. डॉक्टरच कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, बेड उपलब्ध करून देणे अवघड नाही, मात्र आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडले तर उपचार कोण करणार? त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे महापालिकेचे वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच कोरोना विभागप्रमुख डॉ. आवेश पलोड या दोन मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
'शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदी करावी लागेल'
नागरिकांनी नियम पाळले नाहीतर शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदी करावी लागेल, असे आयुक्त म्हणाले. काल दिवसभरात 3 हजारांहून अधिक नव्या कोरोनारुग्णांची जिल्ह्यात नोंद झाल्याने आज तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह इतर नेते ही बैठकीला उपस्थित होते.
सद्यस्थितीत १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ३१५ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत २ हजार २६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.