नाशिक - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारपासून(22 ऑगस्ट) ओझर विमातळावरून नाशिक-मुंबई ही विमानसेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअर या विमान कंपनीच्या वतीने ही विशेष सेवा दिली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अलायन्स एअर कंपनीचे पाहिले विमान नाशिकहुन मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले आहे.
22 ऑगस्टला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी हे विमान मुंबई हुन नाशिकला निघेल ते ओझर विमानतळावर 5 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. आणि नाशिकहून ते सायंकाळी 6 वाजता मुंबईला निघेल व ते 6 वाजून 45 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.
यापूर्वी अलायन्स एअर कंपनीने नाशिक मुबई विमानसेवा एक दिवसासाठी दिली होती. मात्र त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही विमान सेवा बंद करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात पुन्हा सुरू करण्यात आलेल्या विमान सेवेला प्रवाशी प्रतिसाद देतील, असा विश्वास अलायन्स एअर कंपनीला आहे. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नाशिक-हैद्राबाद, नाशिक -अहमदाबाद या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता नाशिक-मुंबई विमान सेवेला देखील प्रवासी प्रतिसाद देतील अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईला प्रवास करण्यासाठी एसटी बस सोबत आता नाशिककरांना विमानाच्या प्रवासाचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विमासेवा प्रभावित झाल्या होत्या.