नाशिक - महानगरपालिकेची महासभा आज (शुक्रवारी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी हे कोरोनाबाधित असल्याने उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी हंगामी सभापती म्हणून कामकाज बघितले. मात्र, या ऑनलाइन महासभेला मनसेच्या नगरसेवकांनी विरोध केला.
मनसेची मागणी...
स्थायी समितीच्या सभागृहात या सभेला सुरुवात होताच मनसे नगरसेवक सलीम शेख, अशोक मुर्तडक, योगेश शेवरे यांनी या ऑनलाइन महासभेमुळे चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असल्याचा आरोप केला. तसेच त्यामुळे पुढील महासभा ही ऑफलाइन पद्धतीने सभागृहात घेण्यात, यावी अशी मागणी मनसेने केली आहे.
हेही वाचा - शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक
विधानसभेचे कामकाज ऑफलाइन होते मग महासभेचे का नाही?
विधानसभेचे कामकाज ऑफलाइन पद्धतीने विधान भवनात होऊ शकते. मग महासभेचे काम सभागृहात का होऊ शकत नाही? असा प्रतिसवाल मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी केला. ऑनलाइन महासभेत चुकीच्या पद्धतीने कामकाज होत आहे. अशा चुकीच्या पद्धतीचे काम उघडकीस येऊ नये, म्हणून ऑनलाइन पद्धतीने महासभा घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही मनसेने केला.