नाशिक - शहराचे महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केलं आहे.
नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांना सोमवारी थकवा व अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्यांचा 'आरटी-पीसीआर' अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आला आहे. मात्र त्यांच्या छातीच्या एक्सरेमध्ये फुप्फुसाला संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही तासानंतर त्यांचा दुसरा स्वॅब चाचणीसाठी घेतला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. महापौर कुलकर्णी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी नियमीत संपर्क असणाऱ्या सहकाऱ्यांना लक्षणे असल्यास तपासणी करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन-
महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. अर्सेनीकच्या गोळ्या व काढा यांचा वापर करावा, असे आवाहन विविध सार्वजनिक कार्यक्रमातदेखील केले होते.
नाशिकच्या राजकीय नेत्यांनी केली कोरोनावर मात-
नाशिक शहरात विविध राजकीय नेत्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. यात खासदार हेमंत गोडसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ, आमदार देवयानी फरांदे आमदार सरोज अहिरे,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांसह विविध नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच अनेक नगरसेवकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.
जिल्ह्यात कोरोनाचे कमी प्रमाण-
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे कोविड सेंटर हळूहळू रिकामे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेकडून अँटीजेन टेस्ट बंद करण्यात आल्याने नव्याने रुग्ण संख्या कमी येत असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हाच आकडा महिन्याभरापूर्वी 10 हजार इतका होता.