नाशिक - शहरातील एका तरुण वकिलाला परदेशी युवतीची मैत्री चांगलीच महागात पडली. तरुणीने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करत एका वकिलाला तब्बल पावणे नऊ लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत नाशिकच्या सायबर क्राइममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पीडित वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून फेसबुकवर लंडन येथे राहणाऱ्या युवतीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट स्वीकार केल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. दोघांमध्ये मैत्री वाढत गेल्याने एकमेकांना व्हॉटसअप आणि मॅसेंजर वर बोलू लागले. एक दिवस युवतीने माझे भारतात कोणी नातेवाईक नाही, असे म्हणत मी भारतात येत असल्याचे विमानाचे तिकीट पाठवले. पीडित वकिलाला तिच्यावर बोलण्यावर विश्वास बसला. दुसऱ्या दिवशी संशयित युवतीचा फोन आला. ती म्हणाली मी दिल्ली विमानतळावर आली आहे. मात्र, सोबत पाऊंडमध्ये मोठी रक्कम आहे, असे सांगून विमानतळ्याच्या अधिकाऱ्यांनी थांबवले आहे.
पाऊंडचे भारतीय चलनात रुपांतर करण्यास सांगितले आहे. यासाठी तिच्या एका मित्राने कस्टम अधिकारी असल्याचे भासवत फोन केला आणि दिल्लीमधील ३ बँकामध्ये पैसे भरण्यास सांगितले. पीडित वकिलाने ३ लाख, ५ लाख आणि ७५ हजार अशी रक्कम बँकेत भरली. २ दिवसांनी नाशिकला येणार असल्याचे सांगत दिल्लीमधील हॉटेलचा पत्ता युवतीने दिला होता. २ दिवस झाल्यानंतर संशयित युवतीने पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर पीडित वकिलाचा संशय बळावला. दिल्ली येथील हॉटेलला फोन लावून युवतीबाबत चौकशी केली असता अशी कुठलीच एनआरआय युवती हॉटेलमध्ये राहत नसल्याचे वकीलाला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित वकिलाने नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
काय आहे हनी ट्रॅप
गुप्त माहिती काढण्यासाठी महिलांचा वावर करून जाळ्यात ओढले जाते. याआधारे गैरकृत्य अथवा फसवणुक केली जाते. यामध्ये कंपनीचा डाटा चोरी करणे, मैत्रीचा बहाणा करुन पैशाचा गंडा घातला जातो. फेसबुक रिक्वेस्ट पाठवून मुलींच्या आवाजात सवांद साधला जातो. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पैशाची मागणी केली जाते.